Friday, June 19, 2015

कांदा भजी


साहित्य: ३-४ लांबे कापून घेतलेले कांदे, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, लाल तिखट, तळण्यासाठी तेल
कृती: कापलेल्या कांद्यावर, लाल तिखट, मीठ, थोडं तांदळाचे पीठ आणि बेसन टाकावे.



कढईत तेल गरम करून त्यात भजी तळून घ्यावे. सॉस, चटणी, पावाबरोबर गरमागरम कांदा भजी खायला तयार.




Tuesday, April 28, 2015

टॉमेटो-नारळ वडी

साहित्य: २ वाट्या खिसलेल्या टॉमेटोचा गर, १ वाटी नारळाचा खीस, २ वाट्या साखर, २ चमचे दूधाची पावडर, १ चमचा तूप
कृती:
एका कढईत तूप, नारळ टाकून परतवून घ्यावे. त्यात टॉमेटोचा गर, साखर टाकून ढवळत रहावे. मिश्रण सुकं होत आलं की दूधाची पावडर टाकावी. बाजूने तूप सुटायला लागलं की गॅस बंद करावा. एका थाळीत तूप लावून त्यात मिश्रण टाकून वड्या कापून घ्याव्यात. थंड झाल्यावर आंबट-गोड वड्या खाण्यासाठी तयार!

Monday, April 27, 2015

गुपचुप वडी


साहित्य: १ वाटी रवा, १ वाटी तूप, २ वाट्या साखर, १ वाटी बेसन, २ चमचे गव्हाचे पीठ, वेलची पूड, सुका मेवा आवडीनुसार
कृती: एका थाळ्यात साखर आणि तूप टाकून चांगले फ़ेसून घ्यावे. त्यात रवा, बेसन, गव्हाचे पीठ एकामागे एक असे टाकून प्रत्येक वेळी फ़ेसून घ्यावे. नंतर वेलची पूड आणि सुका मेवा घालून नॉनस्टीक पॅन मध्ये तूपाचा हात लावून हे मिश्रण पसरवून घ्यावे. बाजूने थोडं तूप सोडावे. एक सुका तवा किंवा थाळी झाकण म्हणून ठेवावे. हलक्या आचेवर १/२ तास शिजवावे. नंतर उलट करून वरील बाजू १० मिनिटे गॅसवर ठेवावे. पंख्याखाली थंड करून त्याच्या चौकोनी (किंवा आपल्याला हव्या त्या आकारात) वड्या पाडाव्यात. गुपचुप वडी तयार!

Sunday, April 26, 2015

कोबीचे थालीपीठ

साहित्य:
२ वाटी बारीक खिसलेला कोबी, १ वाटी बारीक खिसलेला कांदा, १/२ खिसलेला नारळ, १/२ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी बेसन, १/२ वाटी कोथिंबीर, थोडंसं आलं, वाटलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, चवीपुरती साखर
कृती:
वरील सर्व जिन्नस एकत्र करावे. गरज वाटल्यास थोडं पाणी घालावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा. नॉनस्टीक तव्यावर चमच्याने किंवा हाताने पसरून दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे. हे थालीपीठ नुसते किंवा टॉमेटो सॉस बरोबर खाता येते.

टॉमेटो सॉस

साहित्य:
१ किलो लाल रसदार टॉमेटो, १ कांदा, लसूण ५-६ पाकळ्या, १ चमचा गरम मसाला, लाल तिखट sodium benzoate, लाल विनेगर, मीठ, साखर
कृती:
टॉमेटो धुवून चिरायचे. त्यात चिरलेला कांदा, लसूण टाकून प्रेशर कुकर मध्ये पाणी न घालता ४ शिट्या वाजेपर्यंत शिजवावे. कुकर थंड झाल्यावर मिश्रण मिक्सर मधून वाटावे व जाड बुडाच्या भांड्यात गाळून घ्यावे. त्यात १ कप विनेगर, १ चमचा गरम मसाला, दिड चमचा लाल तिखट, मीठ, २ चमचे साखर घालून मध्यम आचेवर उकळावे. एक चिमटी sodium benzoate पाण्यार घोळून टाकावे व सॉसच्या consistency पर्यंत उकळून घ्यावे. गरम असताना एका सुक्या काचेच्या बाटलीत भरावे व गार झाल्यावर बाटलीचे झाकण लावावे. टॉमेटो सॉस तयार!

Thursday, April 23, 2015

बीटाचा हलवा

साहित्य: ४ मध्यम आकाराचे बीट, १/२ वाटी साखर, पाव लिटर दूध, सुकामेवा आवडीप्रमाणे, वेलची व जायफ़ळ पावडर.
कृती: बीट बारीक खिसून घ्यावे. गॅसवर दूध गरम करावे व त्यात खिसलेला बीट घालावा. हलक्या आचेवर दूध आटेपर्यंत शिजवावे. नंतर त्यात साखर, चिमूटभर जायफ़ळ, पाव चमचा वेलची पूड घालावे. तयार बीटाच्या हलव्यावर सुकामेवा आवडीप्रमाणे घालावा. गरमागरम बीटरूट हलवा खाण्यास तयार. फ़्रिजमध्ये थंड करूनही खाता येतो.

घावन-cum-उत्तपा


सौ. लोचना भानुशे
माझ्या आईने मागील ४५ वर्षात जे जे पदार्थ करून शेकडो लोकांना खाऊ घातले त्यातील काही इथे देत आहे.


साहित्य: २ वाटी उकडा तांदूळ, १ वाटी इडली रवा, दीड वाटी उडीद डाळ, २ वाटी बारीक खिसलेला कांदा, १ वाटी खिसलेला नारळ, कोथिंबीर, मिर्ची, मीठ, २ ग्लास पाणी, १ छोटी वाटी तेल
कृती: तांदूळ, रवा व उडीद डाळ एकत्र करून त्याचे पीठ करावे. तयार पीठामध्ये कांदा, नारळ, मिर्ची, कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालावे. मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून ते घोटावे. थोडा वेळ ठेवावे. मग गरम तव्यावर हे मिश्रण उत्तपासारखे घालावे, थोडं तेल सोडावे. दोन्ही बाजूने झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा कच्च्या कैरीच्या लोणच्या बरोबर खावे.